pitrupaksh 2023

  

   मृत्यू जो अप्रिय असूनही सर्वमान्य आहे. ईश्वराचे अवतार असो वा साक्षात्कारी संत, राजा वा रक, सज्जन वा दुर्जन असो पण त्याच्या तडाख्यातून कधीच कोणी सुटले नाही. एका क्षणात सारा खेळ संपून जातो. उरतात त्या फक्त आठवणी, रडणे, विरह, गुणवर्णन. मृत्यू तसा सुंदरही आहे कारण असाध्य रोगाने जर्जर झालेल्या माणसाला हा अपरिचित पाहुणा जवळ येऊन प्रेमाने सांगतो, 'चल बाबा माझ्याबरोबर'. हिंदू धर्मात पितृपंढरवडा हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. हा सण नाही, उत्सव नाही तर आपल्याला सोडून गेलेल्या माणसाला तृप्त करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ व त्यांच्यासारखेच आपल्यालाही एकदा हे जग सोडून जावयाचे आहे याची जाणीव करून देणारा काळ होय. माणूस कधीही मृत होवो, तो ज्या तिथीला मृत झाला असेल त्या तिथीला भाद्रपद महिन्याच्या वैद्य  प्रतिपदेपासून तो अमावस्येपर्यंत त्याच्या नावाचे 'श्राद्ध' कर्म करावे म्हणजे मृतात्म्याला आनंद होतो अशी श्रद्धा व प्रथा आहे.

    पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्ये वा उत्सव या काळात न करणयाचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे. मृत पितरांना मंत्रांद्वारे आवाहन करून त्यांना प्रिय असलेले भोजन श्रद्धेने समंत्रक विधीपूर्वक अर्पण केले जाते त्या कर्माला 'श्राद्ध' म्हणतात. श्राद्धया यत क्रियेत ते तत श्राद्ध: | 'श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय'. पितरांना तृप्त करण्यासाठी केलेल्या विधीला 'तर्पण' म्हणतात. पितृपक्ष, श्राद्धपक्ष, महालयपक्ष व पितृपंधरवडा इत्यादी नावाने हा काळ प्रसिद्ध आहे. महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण –पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. सुरुवातीच्या काळात श्राद्ध अग्नीमध्ये समिधा व पिंड अर्पण करत होत असे. नंतर पितरांच्या नावाने भाताचे पिंड तयार करून पिंडदान करण्याची प्रथा पडली व त्यानंतर पितरांच्या नावाने ब्राह्मण व एखाद्या व्यक्तीला भाताची खीर, बेसनाचा लाडू, पाटवडी, पंचामृत इत्यादी पदार्थ जेवू घालण्याची पद्धत पडली. भाद्रपद वद्यपक्षात आपली पितरे यमलोक सोडून मृत्यूलोकी आपल्या कुटुंबीयांकडे राहण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे.

    पितरांचे श्राद्ध करण्यासाठी पितृपंधरवडा निवडण्यामागे काही कारणे आहेत. उत्तरायण-दक्षिणायन असे सहा-सहा महिन्याचे वर्षाचे दोन भाग आहेत. प्राचीन काळी आपले पूर्वज ज्या भागात राहत होते तेथे दक्षिणायन भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होत असे.  दक्षिणायन सुरू झाल्यावर पहिले पंधरा दिवस पितृपक्ष सुरू होत असे. पितरांसाठी यज्ञ करणे, काही दान करणे वा जेऊ घालणे या काळात केले जात असे. नंतर दक्षिणायन व उत्तरायण यांचे स्वरूप बदलले आहे. पौष महिन्यात मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होऊन आषाढ महिन्यात संपते व नंतर दक्षिणायन सुरू होते. कालमापन जरी बदलले असले तरी पितरांचा पक्ष म्हणून भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतरचा 15 दिवसांचा काळ आहे तसाच ठेवण्यात आला. श्राद्धाच्या दिवशी आमंत्रित व्यक्तीस श्रद्धाचे जेवण घालून पितरांच्या नावाने दान द्यावे. भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे.[११] गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणात. भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते. 

तर हे आहे पितृपक्षाचे माहात्म्य.        


कार्तिकी पौर्णिमा, तुलसी विवाह, वैकुंठ चतुर्दशी आणि देव दिवाळी

श्री गोरक्षनाथ प्रकटदिन विशेष कथा

गोरक्षनाथांच्या गुरूभक्तिची ही कथा माहीत आहे का?