gorakshanath, gorakhnath


एक दिवस मच्छिन्द्रनाथ भिक्षा मागत एका गावात गेले व एका घरात भिक्षेसाठी आवाज दिला. आवाज ऐकताच घरातून एक स्त्री घराबाहेर भिक्षा घेऊन आली. भिक्षा देऊन त्या स्त्रीने पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मागितला. मच्छिन्द्रनाथ हे सिद्ध होते. त्यांनी त्या स्त्रीला भस्म मंत्रून दिले व सांगितले कि याचे सेवन केल्याने तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला एक महा तेजस्वी पुत्र होईल ज्याची ख्याती चारही दिशांना होईल. असा आशीर्वाद देऊन मच्छिन्द्रनाथ  तेथून पुढे गेले. अयोध्या, मथुरा, अवंती, कशी, काश्मीर, मथुरा, प्रयाग, गया अशी तीर्थक्षेत्रे करून १२ वर्षांनी मच्छिन्द्रनाथ पुन्हा त्या गावात भिक्षा मागण्यासाठी आले. एका ब्राम्हणाचे घर पाहताच त्यांना भस्माची आठवण झाली. त्यांनी भिक्षेसाठी आवाज दिल्यावर एक स्त्री बाहेर आली. मच्छिन्द्रनाथांनी त्या महिलेला तिच्या पतीचे नाव, तिचे नाव व जात गौडब्राह्मण वगैरे सर्व विचारले. तेव्हा त्यांना खूण पटली. त्यानंतर त्यांनी मुलगा कोठे आहे असे विचारले. तेव्हा ती म्हणाली अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही. मच्छिंद्रनाथाने विचारले, मी १२ वर्षांपूर्वी तुला जे भस्म सेवन करण्यासाठी दिले होते त्याचे तू काय केले? तेव्हा तिने घाबरून सांगितले, कि ते भस्म तिने उकिरड्यावर फेकून दिले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी विचारले की तू भस्म फेकून का दिलेस? तेव्हा ती म्हणाली, मला आजूबाजूच्या स्त्रिया एका साधूवर विश्वास ठेवल्यामुळे चिडवू लागल्या. म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला. माझ्या या अन्यायाची मला क्षमा करा. मच्छिन्द्रनाथ म्हणाले की तू जिथे भस्म टाकले होते ती जागा मला दाखव. मग त्या स्त्रीने जेथे भस्म टाकले होते तो मोठा उंच गोवराचा ढीग मच्छिंद्रनाथांना दाखवून येथे  भस्म टाकला असे सांगितले. ती जागा पाहिल्यावर मच्छिंद्रनाथांनी आवाज दिला हे प्रतापवंता,  हरिनारायणा, सूर्यसुता, तू जर गोवरात असलास तर बाहेर नीघ. तुझा जन्म येथे झाला आहे व आज १२ वर्षे यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेविले आहे. हे शब्दा ऐकताच आतून आवाज आला, हे गुरुराया, गोवराची रास मोठी असल्यामुळे मला बाहेर निघता येत नाही. गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे. यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथास बाहेर काढले. बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. हे पाहून त्या स्त्रीला  खूप मोठा पश्चात्ताप झाला. असा पुत्र आपल्या हातून गेला. म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली. तेव्हां मच्छिंद्रनाथ म्हणाले. आता का रडतेस? तुझ्या नशिबात न वळतात. मग तो तुला कोठून प्राप्त होणार? तून मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला तेथून जाण्यास सांगितले. यानंतर गोरक्षनाथ गुरूच्या पाया पडला. त्यावर मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन. उपदेश केला व आपला वरहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला व त्यास नाथदीक्षा दिली व ते त्यास घेऊन. तीर्थयात्रेस निघाले.