जेव्हा गोरक्षनाथ प्रकट झाले तेव्हा मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथांना घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाले. मच्छिन्द्रनाथ हे गोरक्षनाथांना घेऊन तीर्थ करत हिंडत असताना जगन्नाथला जाण्याच्या वाटेवर कणकगिरी गाव लागले. तेथे येतात भुकेने व्याकुळ झालेल्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथास भिक्षेस पाठवले. गोरक्षनाथ घरोघरी जाऊन भिक्षा मागत होते. त्यावेळी ते एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी पितृतीथ होती म्हणून त्या घरी चांगले पक्वान्न केले होते. तेथे जाऊन गोरक्षनाथाने 'अलख' शब्द केला. हे एकूण घरातील एक स्त्री बाहेर आली. महातेजस्वी अशा गोरक्षनाथाला पाहून हा कोणीतरी योगी असावा असा विचार तिच्या मनात आला व त्यावेळेस तिने तयार केलेले सर्व पदार्थ एका पानात वाढून दिले. अनेक पदार्थ पाहून गोरक्षनाथ समाधानी झाले व तिला आशीर्वाद देऊन तेथून निघून गेले. ती भिक्षा घेऊन ते गुरु मच्छिन्द्रनाथांकडे परत आले. पक्वानांनी भरलेले पान पाहून मच्छिंद्रनाथांना आनंद झाला व ते जेवायला बसले. अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ पोटभर जेवले तरीही त्यांच्या पात्रात एक वडा राहून गेला तेव्हा गोरक्षनाथाकडे त्यांनी पाहिले व गोरक्षनाथांनी इच्छा काय आहे हे कळवावे अशी विनंती केली त्यावर गुरु मच्छिन्द्रनाथांची वड्या बद्दलची इच्छा ऐकताच मी पुन्हा घेऊन येतो असे म्हणून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेले व त्या स्त्रीपाशी आणखी वडे मागू लागले तेव्हा ती स्त्री म्हणाली गुरूंचे नाव कशाला नाव घेतोस? तुलाच पाहिजेत असे सांग ना. हे एकूण त्याने तिला सांगितले खरोखर मला नकोत मी गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडे मागून नेत आहे. तेव्हा ती स्त्री म्हणाली असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय? तिचे हे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाले, तू मागशील ते मी द्यायला तयार आहे पण माझ्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वडे दे. हे एकूण गोरक्षनाथाची परीक्षा पाहण्यासाठी तिने त्यांचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथ यांनी डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व तिच्या हवाली करू लागले. तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली हे पाहून त्या स्त्रीला फारच कळवळा झाला व ती आतून पाच सात वडे घेऊन बाहेर आली व त्यांच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलले होते. माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, तू का खंती होतेस? वड्यांचा मोबदला मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली माझ्यावर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला. मग गोरक्षनाथांनी तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाले व परत गुरूंकडे आले. जो झाला तो प्रकार गुरूंना कळू नये म्हणून डोळ्यावर पट्टा बांधला होता. पट्टा बांधण्याचे कारण गुरूंनी विचारले, परंतु हे ऐकून त्यांना दुःख होईल व ते वडे खाणार नाहीत व त्यांची इच्छा अशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधला म्हणून सांगितले. पण गुरुजींनी डोळा दाखवण्यासाठी हट्ट घेतला तेव्हा गोरक्षाने झाला सर्व प्रकार कळवला व अन्यायाची क्षमा करण्याकरिता विनंती केली. मग बुबुळ मागून घेऊन मच्छिंद्रनाथांनी मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसवून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसून त्यांच्या तोंडावरून हात फिरवला. नंतर उभयतांनी भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिन्द्रनाथांनी त्यास सर्व साबरी विद्या शिकवली आणि अस्त्रविद्येतही निपुण केले. तर ही होती गोरक्षनाथांची मच्छिंद्रनाथांप्रतीच्या गुरुभक्तीची कथा.